Sunday, 14 July 2019

वारकर्यांचा देव

वारकर्यांचा देव
लहानपणी पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा एक धडा पुस्तकात होता --- विश्वाचा देव आणि मानवाचा देव . त्यात सावरकरांनी लिहिले होते कि कसे विश्वाचा देव आणि मानवाचा देव हे दोन्ही अत्यंत भिन्न आहेत. त्याच अनुषंगाने आज वारकर्यांच्या देवावर लिहावेसे वाटते. वारकर्यांचा देव म्हणजेच पांडुरंग हा नामाचा आणि त्यातील भावाचा भुकेला आहे. त्याला तीनत्रिकाळ पूजा कर्म कांड नको आहे. त्याची पूजा बांधायला ब्राह्मणही त्याला नको आहेत. तो असे कधीच म्हणत नाही कि सर्व संसार सोडून माझे नाव घेत बसा. उलट कर्म करताना माझे स्मरण करीत राहा अशी संतांची शिकवण आहे.
ज्ञानदेव हे अत्यंत क्रांतिकारी संत होते असे मला वाटते कारण स्वतः नाथ पंथी असूनही सामान्यांसाठी त्यांनी सोपा असा भक्ती मार्ग सांगितला. नाथपंथी हे खरे तर निर्गुणाचे उपासक आणि म्हणूनच आदिनाथ अथवा गोरक्षनाथ यांची भजने निर्गुणी भजनेच. त्यांनी कोठेच मंदिरे उभारली नाहीत व त्यांची स्वतःची हि नाहीत. ज्ञानदेव तर अत्यंत कठीण अशा हठयोगाचे योगी. सर्व सिद्धी त्यांना ज्ञात होत्या पण सामान्यात, गोरगरीबात राहायचे म्हणून त्यांनी या सिद्धींचा उपयोग अगदी आवश्यक तेंव्हाच केला. ब्राह्मण वर्गाकडून कठोर वागणूक मिळूनही त्यांनी त्यांचे बद्दल कधीच टीका व उपहासगर्भ वचने काढली नाहीत. कबीर बहुतेक त्यांचा समकालीन पण कबीरा प्रमाणे कठोर मूर्तीपूजे विरुद्ध लिखाण त्यांनी केले नाही. परंतु ज्या भक्ती पंथाची रचना त्यांनी केली त्यात नामस्मरण व त्यातून चिंतन हि शिकवण त्यांनी दिली. सामन्यास कठीण वाटणारी योगमार्गाची सोपी वाट त्यांनी ज्ञानेश्वरी लिहून सामन्यासाठी मोकळी केली. वारकर्यांचा देव म्हणूनच मूर्तीत प्रकट असला तरी भक्ती मात्र हृदयात असलेल्या देवाचीच करावी हि खरी त्यांची शिकवण. आणि म्हणूनच वारकर्यांचा देव पंढरपुरात असला तरी तो खरा प्रत्येक वारकर्याच्या हृदयात आहे. हा देव श्रीमंतांचा वातानुकूलित भक्ती करणार्या भक्तांचा नाही तर शेतात राबणार्या दरिद्री नारायण शेतकऱ्याचा देव होय. काही वेळा अशा देवाच्या नावाने कर्मठ पूजाकांड करणार्या लोकांना म्हणून ज्ञानेश्वर आणि तुकोबादी संताना अभिप्रेत असणारा देव समजलाच नाही असे म्हणावेसे वाटते! आषाढ महिन्यातल्या या पवित्र समयी सर्वांनाच या देवाचे आशीर्वाद आणि कृपा लाभो हि त्याचे चरणी प्रार्थना!

मोहन कोतवाल
जुलाई 2016


No comments:

Post a Comment